बुधवार, २३ मे, २००७

तुम्हाला काय वाटतं?


तुम्हाला जर मी विचारले, दिवाळी कुठल्या महिन्यात येते... किंवा मराठी महिन्यांची नावे न अडखळता सांगा... तर कदाचित तुम्हाला असे वाटेल की हिला वेड वगैरे लागले की काय ? अगदी दुसरी -तिसरीतले मुलंही बारा मराठी महिन्यांची सांगेल किंवा दिवाळी अश्विन महिन्यात असते....
माझाही कालपर्यंत असाच समज होता की, एवढी जुजबी माहिती, प्रत्येक मराठी माणसाला असणारंच...
पण काल माझा हा समज, गैरसमज ठरला....
-------------------------
माझ्या टीममधल्या एकाने ( तो मराठी आहे..) , नवीन फ्लॅट घेतला... मी त्याला सहजच विचारलं,
मी : कायरे, गेलास का नवीन घरी रहायला....
तो : नाही अगं.. तो अधिक की काय सुरु आहे नं ... म्हणून आई म्हणाली की सध्या गृहप्रवेश नाही करायचा...
मी : हो बरोबर आहे... अधिक महिन्यात नवीन काही सुरुवात करत नाहीत.. आणि काही शुभकार्य ही करायचं नसतं...
तो : पण काय असतो गं हा अधिक महिना म्हणजे ?
त्या बापड्याने, अधिक महिना आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला होता बहुतेक..त्याच्या प्रश्नावर, मी आणि अपर्णा त्याला अधिक महिना तीन वर्षांनी कसा येतो...चांद्रमास वगैरे समजावून सांगू लागलो...तर तो म्हणे... तुम्हाला इतकं सगळं कसं काय माहिती.... !!
-------------------------
विषय वाढत गेला आणि मी त्याला सहज म्हणाले की अधिक महिना सोड.. पण वर्षाचे बारा महिने तरी माहिती आहेत ना.. तो हो तर म्हणाला.. पण त्याची गाडी, चेत्र, वैशाख, ज्येष्ठ म्हणत भाद्रपदावरच थांबली.... आम्ही दोघी आश्चर्यचकित....!!! हा इतका भारी... म्हणे, शाळेत तिसरी -चौथीत शिकलेलं आत्तापर्यंत कसं लक्षात रहाणारं... आणि काय उपयोग ते माहिती असून ?? मी म्हणाले, अरे आपले सगळे सण-वार ह्यावरच ठरतात ना...संक्रांत सोडली तर इतर सगळे सण मराठी महिन्यानुसारच येतात... !! ह्यावर काय म्हणाला असेल हा मुलगा...मला फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कधीतरी दिवाळी येते हे माहिती आहे...
आणि आपल्याला हे माहिती नाहिये, याची खंतही नाही त्याला !! आम्हालाच त्याने सुनावले, काय फरक पडतो.. ही माहिती नसल्याने ? कितीतरी जण असे असतील की ज्यांना हे लक्षात नसेल किंवा माहिती नसेल... How does it really matter???
त्याच्याशी वाद घालून आम्ही दमलो... आणि "फरक तो पडता है भाई..." असे मनात म्हणत आपापल्या कामाला लागलो...
-------------------------
तुम्हाला काय वाटतं... त्याचं बरोबर आहे?

मंगळवार, २२ मे, २००७

तुम्ही काय करता अशा वेळी...?


बाहेर काय मस्त वातावरण आहे....ढग भरुन आले आहेत..उन गायब झाले आहे...छान हवा आहे.. वा-याने गुलमोहोराच्या फांद्या झूलत आहेत..गुलमोहोर, बहावा रस्त्यावर पायघड्या घालत आहेत... आणि अशा वेळी भटकायचं किंवा खिडकीत बसून निसर्ग अनुभवायचं सोडून की-बोर्डवर बोटं आपटत बसणं किती बोरिंग !!
दुपारी जेवण झाल्यावर थोडसं फिरुन आलो..मध्येच उन-सावलीचा खेळ सुरु झाला.. क्षणभर वाटले... अरे श्रावण सुरु झाला की काय ? मग इच्छा नसतानाही पुन्हा ऑफिसमध्ये यावे लागलेच..
ऑफिसमधली समस्त जनता बाहेरच्या जगाशी काहीही देणंघेणं नसल्यासारखी आपापल्या मशिनसमोर डोकेफोडी करते आहे...मला काम सुचतच नाही...आणि मी आणि माझी मैत्रिण अपर्णा उगीचच वेड्यासारखे मिटिंग रुम मध्ये जातो..तिथले पडदे सरकवून बाहेरचे दृश्य डोळ्यात साठवू पाहतो...

तुम्ही काय करता अशा वेळी...?

सोमवार, २१ मे, २००७

शुभेच्छा

लाडक्या सोनालीस,
आज तुला काय द्यावे,
यावर खूप विचार केला..
मग लक्षात आले,
लाडक्या बहिणीला द्यायला,
शुभेच्छांहून अधिक मोलाचे,
काय असू शकते...?

नावाप्रमाणेच तुझे, आयुष्य सोनेरी व्हावे,
हास्याची दैवदेणगी सदैव साथ राहू दे !

जीवन तुझे फुलून यावे, प्राजक्ताच्या बहराप्रमाणे...
आणि त्याचा दरवळ दाही दिशांना पसरू दे !

मोठेपण मिळव आभाळाएवढे...
आणि तुझ्या प्रेमाची सावली सर्वांवर पडू दे !

शब्द ही आहेत अपूरे, मनातले सांगायला...
विवाहाच्या मंगलसमयी, माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!!

शुक्रवार, १८ मे, २००७

असशील का रे तू...

असशील का रे तू माझ्याच सारखा...
थोडा शहाणा... अन थोडासा वेडा ?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
गुलमोहोर बघताच डोळ्यात साठवणारा?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
हरेक पावसाच्या प्रेमात नव्याने भिजणारा?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
जगजीतच्या आवाजात हरवून जाणारा?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
रात्रभर जागून पुस्तक संपवणारा?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
दुस-राला ठेच लागता डोळ्यात पाणी येणारा?

असशील का रे तू माझ्याच सारखा...
थोडा शहाणा... अन थोडासा वेडा !!

मंगळवार, १५ मे, २००७

गेलीस तू निघोनी साजणघरी..

लाडके..
गेलीस तू निघोनी साजणघरी...
आठवणीत तुझ्या मन हे भिजत आहे,
येशील कुठूनशी, पुढल्याच क्षणाला,
आम्हाला असे उगीच भासत आहे...

"सोनू"... आई सवयीने हाक मारते !
न येता प्रतिसाद तुझा, डोळ्यात पाणी येते..
घरभर विखुरलेल्या तुझ्या खुणां...
मन अधिकच वेडावून जाते...

तुझ्याविना घर हे रिते वाटत आहे...
पण ,तू व्यापले असशील सासर सारे,
ह्या कल्पनेने मन सुखावते आहे...

होईल सवय हळूहळू तुझ्या नसण्याची...
तुझ्या सुखात आमचे सुख भरुन वाहेल...