टेकडीवर पोहोचलं की बाकीच्या जगापासून आणि रोजच्या रहाटगाडग्या तून मी खूप लांब जाते.सारे मुखवटे गळून पडतात आणि वय ही..
मी आणि शिरीष गेले कित्येक महिने नियमित वेताळ टेकडीवर फिरायला जातो..
प्रत्येक वेळेस वेगळीच टेकडी अनुभवायला मिळते.
गुलाबी फुलांच्या बहरात नाहून गेलेली टेकडी मागच्या महिन्यात हळूहळू बदलायला लागली..निराळं रूप ल्यायला लागली.
या वेळेस गेलो होतो तेव्हा चतुर्शुंगी chya वाटेची आठवण आली. खूप दिवसात तिकडे फिरकलो नव्हतो. ही एक वेगळीच गम्मत आहे टेकडी ची..दर वेळेस कुठली तरी वेगळीच वाट गवसते..आणि नव्या वाटा धुंडाळत फिरताना आपण टेकडी चे आणि ती आपली कधी होते कळत नाही.
होळी होऊन गेली आहे आणि उन्हाचा चटका सुरू झालाय चांगला च.. सकाळची वेळ असली तरी उन्हाने रापलेल्या माती cha ek खरपूस वास हवेत जाणवत होता. आणि त्याच्या सोबत वाळलेल्या पानांचा, फांद्यांचा आणि कुठे कुठे पालवी फुटू लागली होती त्याचाही..ढगाळ हवा होती त्यामुळे थोड कुंद होत वातावरण..
निष्पर्ण झालेल्या झाडांमुळे एरवी लपलेल्या जागा, वाटा समोर येत होत्या. अनावश्यक ते सारं सोडून नव निर्मिणारी ती कुणी योगिनीच होती जणू..
खाण सोडून उजवी कडे वळून आम्ही पुढे निघालो..जाताना रांगेने उभ्या असलेल्या चाफ्याच्या झाडांना दुर्लक्षून जाणं अशक्य ..तरी अजून गुलमोहोर यायचा आहे..
आम्ही चतुर्शुंगी chya वाटेवर भटकत पुढे जात होतो.. लॉयला कॉलेज चा view दिसतो तिथे पर्यंत जायचं असं ठरलं..मध्येच कुठे तरी पांढरी रान फुले उमलली होती. त्यांचा वास श्वासात भरून घेतला..एका उंचवट्यावर पोहोचलो तर टेकडीच इतकं मोहक उनाड, रानटी रूप सकाळच्या कोवळ्या प्रकाशात..ढगाळ वातावरणात अप्रतिम सुंदर दिसत होत..वाळलेल्या गवताच्या इतक्या छटा..त्यात भर म्हणून निष्पर्ण झालेली आणि केवळ शेंगा..बिया उरलेली काही झाडे..काटेरी झाडांना आलेले फुलोरे..आणि मोकळं आकाश..त्यात मुक्त विहार करणारे पक्षी.. तुमचं भान हरपल्या शिवाय राहील?
---------------
टेकडीवर शनिवार रविवार बरीच गर्दी असते. पालकांसोबत येणाऱ्या मुलांपासून सत्तरीच्या तरुणांपर्यंत..असे वेगवेगळ्या वयोगटातले कित्येक जण गटाने किंवा एकटे फिरायला येतात. काही जण ध्यान लावून बसलेले दिसतात..
टेकडीवर फिरायला येणारी ही सारी गर्दी एका ठराविक परिघा नंतर विरळ होते. वेगवेगळ्या दिशांना पांगते. लांबवर चालणारी माणसे एखाद्या किडा मुंगी इतकी किरकोळ जाणवतात..आपले अस्तित्व ही त्याहून फार वेगळे नाही हे टेकडीवर निसर्ग अनुभवताना जाणवत राहते.
फिरत फिरत आम्ही बसायला चांगला कातळ शोधला आणि तिथे पोहोचताना अचानक एक विहीर दिसली..अरेच्चा..इतके दिवस येतोय..आजच कशी दिसली ही? आजूबाजूचे गवत वाळून गेल्यामुळे की काय आम्हाला त्या दिवशी प्रथमच ती जाणवली.
विहिरीकडे जाताना डोकंवायचे ठरवून आम्ही त्या कातळावर स्थिरावलो. वेताळबाबा chya देवळाचा झेंडा लांब फड फडत होता.. खाली शाळेच्या ग्राउंड वर मुले खेळत होती.. वर पाहिले तर नजरेत दूर दूर पर्यंत मोकळे आकाश दिसत होते. मध्येच एक दोन टिटव्या शिळ घालून जात होत्या. सन बर्ड्स भटकत होते..आमच्या जवळपासच लगबगीने मुंग्या इकडे तिकडे करत होत्या.. सारे कसे निवांत निश्चल वाटतं होते. घेशील किती दोन करांनी..तसे पाहशील किती दो नयनांनी..असे होऊन जाते अशा वेळेस.. पंचेंद्रिये जितके जमेल, जसे जमेल तसे अनुभवण्याचा यत्न करतात..जीवाला एक वेगळीच शांतता लाभते..भान हरपून आम्ही तिथे बसून राहिलो..किती वेळ गेला कुणास ठाऊक..मग कधीतरी आम्ही उठलो..विहिरी कडे निघालो..
विहिरीकडे जाणारी पायवाट कुठे तरी हरवली होती गवतात... शिरीष सोबत असं टेकडी भटकताना, माझ्यातल लहान मूल डोकं वर काढतं.. मग ह्या दोन मुली निघाल्या उतारावरून...गवतातून वाट शोधत..विहिरीचं पाणी काही विशेष स्वच्छ नव्हतं..पण उन्हाळ्यात पक्ष्याना आधार देत असणार ही विहीर..
सूर्य उगवती कडून आता बराच वर आला होता..घरची वाट शोधणं अनिच्छेने का होईना क्रमप्राप्त होते..टेकडी वरून पाय निघणं खूपच अवघड असते.. विहिरिकडून चढून वर आलो आणि एक अतिशय सुंदर पक्षी दिसला..आम्ही दोघी पहिल्यांदा च पाहत होतो. तो हिरव्या रंगात सामावून जाणारा, लांब शेपटीचा, बुलबुल एवढा पक्षी होता..पण ग्रीन बी इटर नव्हता ..मग पाहिले तर जोडीने फिरत होता तो..
आता मात्र पावले उचलत आम्ही निघालो..खाण मागे पडली..एका तिठ्यावर गुलाबी रंगाची रानटी फुले( की कळ्या ?)काटेरी झुडूपावर आली होती.. दुर्लक्ष करून जाणं अशक्यच..मग रेंगाळलो तिथे क्षणभर ..
अगदी शेवटच्या वळणावर सगळी झाडे निष्पर्ण झाली आहेत सध्या.. त्या झाडीत अचानक हालचाल जाणवली..म्हणून पाहिलं तर एक मोर दर्शन देत होता.. अहाहा..अजून काय माणसाला टेकडीवर आल्यावर...
शेवटी गाड्या निघाल्याच आमच्या..आणि निघता निघता पुन्हा आम्ही एका भडक गुलबक्षी बोगन वेली पाशी थांबलो च..
---------
टेकडी असे वेड लावते जीवाला...निसर्गाच्या प्रेमात पाडते..आपल्या न कळत आपण तिचे होऊन जातो.. प्रत्येक ऋतुत नवं रूप घेते ती..नव्याने भुरळ घालते... आणि पुन्हा पुन्हा आपण तिच्या ओढीने जात राहतो वेताळ टेकडीवर..नव्या वाटा, जाळ्या गवसत जाताना..स्वतःला ही नव्याने सापडत जातो..