सोमवार, ३० एप्रिल, २००७

उगा नकार देऊ नको...

अधीर नेत्र तुझे, पापण्यांआड लपवू नको..
प्रिती मनात असता, उगा नकार देऊ नको..

तुला भेटल्यावर, तुझा विरह असह्य होतो,
म्हणून का गं मी, तुला भेटण्याचे टाळतो?

दूर असताना तुलाही, माझी आठवण येते ना?
रातीचा चांद पाहून, मन तुझेही झुरते ना?

का तरीही वेडे, अनावर प्रेमा बांध घालशी?
नजरेने सांगितले जे, ओठांवर न आणशी?

तुझ्याचसाठी राणी, मी हे जग सोडले आहे,
परिणामांचे भय सांग तुला मात्र का आहे?

शुक्रवार, २० एप्रिल, २००७

पाऊस पहिला बरसून गेला...

पाऊस पहिला बरसून गेला..
ढगांच्या तालावर, बिजलीला नाचवून गेला..
पाऊस पहिला बरसून गेला..
अतृप्त धरणीला भिजण्याचे वेड देऊन गेला...
पाऊस पहिला बरसून गेला...
उजाड माळरानावर बीजांकूर रुजवून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..
न्हालेल्या सृष्टीला नवा साज चढवून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..
निष्पर्ण मनाला पालवीची आस लावून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..

नको अवेळी बोलावू..

नको नको रे प्रिया,
असा अवेळी बोलावू...
बंधने ही घरदाराची,
सांग कशी तोडू??

भेटण्यास तुला,
मीही आतूरते..
न मी आले तरी,
मन तुझ्याकडे धावते !

अवस्था ही माझी,
तू समजून घे ना..
न येता भेटण्या तुला,
तू रागवू नको ना !!

धीर थोडा धर रे,
मी तुझीच होणार आहे,
विरहाचे हे क्षण तोवरी,
तू मजसाठी सोस ना !!

उन्हाळी सुट्ट्या - ५


आम्ही सगळी मिळून एकूण ११ मावस भावंड..त्यातही तीन जण बऱ्यापैकी मोठे.. पण आम्ही बाकीची चिल्ली-पिल्ली जाम धुडगूस घालायचो.मावशी किंवा मामाकडे कुठेही आमचा गोंधळ सुरु असायचा..मावशी काही बोलत नसे.. मात्र आजी थोडी शिस्तीची..तिथे जरा दबकून रहावे लागायचे..त्यामुळे आमचा जास्तीत जास्त वेळ मावशीच्या घरीच जायचा..
जेवणाचे ही तेच.. जिथे आवडीची भाजी, तिथे आमची पंगत...आमच्या सगळ्या भावंडात एक कॉमन आहे.. कुणालाही वांग्याची भाजी आवडत नाही...पण आजीकडे असली नाटकं ( हा तिचाच शब्द..) चालायची नाहीत...जेवायच्या आधी, स्वयपाकाचा गुपचूप अंदाज घ्यायचा आणि मग ठरवायचं कुठे जेवायच ते...पण जर आजीच्या जर लक्षात आलं तर मात्र सुटका नसे !!
आजी जितकी कडक तितकेच आजोबा मऊ होते..त्यांना सांधेदुखीचा त्रास होता.. आम्हा नातवंडांकडून ते आळीपाळीने, गुडघे दाबून घेत..त्यांच्याकडे भुताच्या गोष्टींचा मोठा खजिना होता..त्यांचे गुडघे दाबताना, त्या गोष्टी ऐकायला सगळ्यांना फारच आवडायचं..दुपारची एक झोप झाली की तेही आमच्यात पत्ते खेळायला सामील व्हायचे...कधीकधी आजीही खेळायची..
मावशीकडे तिचे सासरे होते. त्यांना आम्ही दादा आजोबा म्हणायचो..त्यांनी मोतीबिदूचे ऑपरेशन न केल्याने त्यांची दृष्टी गेली होती..सकाळ्च्या वेळी ते आमच्याकडून पेपर वाचून घेत. प्रभातच्या ठळक बातम्या, अभंगवाणी..एखादी बातमी त्यांना इंटरेस्टिंग वाटली तर ती पूर्ण वाचायला सांगायचे. माझा आवाज एकदम खणखणीत. त्यामुळे बऱ्याचदा ते मला वाचायला सांगत.पेपर वाचून झाला की कधीतरी अचानक कनवटीचा रुपया काढत आणि हातावर ठेवत. एकदम मस्त वाटायचं... खरी कमाई केल्यासारखं..दादा आजोबा जवळ बसवून कधी गप्पा मारायचे, कधी झिम्मा खेळायचे..त्यांना "दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव" हे गाणं फार आवडायचं..टाळ्यांच्या तालावर ते म्हणायचे..त्यांच्या मऊ तळव्यांचा स्पर्श मला खूप आवडायचा..
मावशीच्या अंगणात छोटी बाग होती..तिकडे पेरु, डाळिंब आणि जांभूळ, अशी फळझाडे होती.. दुपारी मोठी माणसे झोपली की आमचा फळं काढण्याचा उद्योग सुरु...मध्येच एखादा कुल्फीवाला घंटी वाजवत यायचा.. मग आईची झोप मोडून किंवा आजोबा जागे असतील तर त्यांच्याकडे कुल्फी मागायची..वाह... काय दिवस होते ते!!! नाहीतर आता... बसलोय ए.सी. मध्ये की-बोर्डची बटणं दाबत..!!
शुक्रवारातल्या मावशीकडे जायचं, पण तेही दोन-तीन दिवस... एकतर तिचे घर थोडे छोटे होते.. आणि दुसरं म्हणजे, खेळायला जागाच नाही.. घराबाहेर पडलं की लगेच रस्ता..
पुण्यात दहा-पंधरा दिवस राहिलं की मग आमचा मुक्काम दहीवडीच्या मावशीकडे..
मावशीचं घर म्हणजे एकदम बंगलाच..अंगणात शहाबादी फरशीचा ओटा, समोर मोठी बाग.. मागे भरपूर मोकळी जागा आणि वर गच्ची...! रात्रीचे जेवण एकतर बाहेरच्या ओट्यावर किंवा मग गच्चीत..जेवायला दर एक-दोन दिवसाआड आमरस !! गावात, दिवसा उन जाणवलं तरी रात्री छान गार हवा असते. गारव्यात आमरसाचे जेवण म्हणजे सुख ! बागेत फुललेल्या मोगऱ्याचा वास वातावरणात सगळीकडे पसरलेला असायचा... रात्री झोपायला अर्थातच गच्चीवर..! रात्री उशीरापर्यंत पत्त्याचे डाव रंगायचे.. लहानांबरोबर मोठेही खेळायचे.. मग झोपताना गच्चीत अंथरुणावर पडल्यापडल्या आकाश निरीक्षण सुरु व्हायचं.. मृग, सप्तर्षी यांना शोधण्याची चढाऒढ लागायची..मध्येच कधीतरी तारा निखळताना दिसायचा..
मेच्या शेवटच्या आठवड्यात अचानक पावसाची चाहूल लागायची.. आभाळ भरुन यायला लागलं की दादाबरोबर रानात जायचं... मोर पहायला...मायणी रोडवर त्या रानात बरेच पक्षी होते..पावसाचे चिन्ह दिसू लागले की मोर थोडे बाहेर येत. मोर बघण्यासाठी किती आटापिटा करायचो. त्यांना चाहूल लागेल म्हणून एकदम चोर पावलांनी चालायचं.. बोलायचं तर बिलकूल नाही..मोरांचा फुललेला पिसारा बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच...पिसाऱ्याचे दर्शन जरी घडले नाही, तरी त्याची पडलेली पिसं गोळा करुन घरी आणायचा छंद साऱ्यांनाच होता..
पाऊस पडला की समजायचं मुंबईला माघारी जायचा दिवस जवळ आलाय...हा मे महिना इतक्या लवकर का संपला असं वाटायचं..पुन्हा शाळा.. अभ्यास...!! घरी जावूच नये, नको ती शाळा आणि अभ्यास..!! पण एक दिवस बाबा यायचे.... आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी आम्हाला निघावंच लागे...

................................................................
उन्हाळ्याची सुटटी पुन्हा एकदा संपायची.. पुढल्या उन्हाळ्यापर्यंत... !!!
(समाप्त)

गुरुवार, १९ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - ४


वाट बघून बघून कंटाळल्यावर एकदाचा ’निकाल’ लागायचा...आईच्या भाषेत, ’आम्ही दिवे लावायचो !’ पुढच्या वर्गाची वाट दिसण्याएवढा उजेड आमचे दिवे पाडायचे.. कधी चुकून-माकून पेपर सोपे असल्यास पहिल्या दहात आमची वर्णी लागायची..पास झाल्याचा आनंद पेढे आणून साजरा करायचा...आणि पुण्याला जायची तयारी करायची...
एस.टी. बस ने जायचे तर मुंबई सेंट्र्लला जायचे, आणि रेल्वेने जायचे तर व्हि.टी. ला जावे लागायचे. तीन वर्षात, आम्ही एकदाच रेल्वेने आलो असू...बाबा रिर्झवेशन करुन ठेवायचे त्यामुळे जागा मिळण्याचा प्रॉब्लेम नसायचा..पण खिडकीची सीट कोणाची.. ह्यावरुन भांडणं व्हायची..त्यातही, ताई थोडी मोठी असल्याने तिची फार कटकट नसायची.. पण मी आणि सोनाली, म्हणजे माझी लहान बहीण, दोघींनाही खिडकी हवी असे..मग आईचा उपाय ठरलेला... खिडकी शेअर करायची.. एक तास मी, एक तास ती...आलटून पालटून त्या सीटवर बसायचो. ९२-९३ साली मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे नव्हता..त्यामुळे पुण्याला पोहोचायला कमीत कमी पाच तास तरी लागायचे. पनवेल, खोपोली, खंडाळा, लोणावळा.. वेगवेगळ्या स्टेशनवर थांबत गाडी पुढे जाई.
प्रवासाला निघायच्या आदल्या दिवशी आई चिवडा, भडंग असा काहीतरी चटपटीत खाऊ करुन ठेवायची.. आणि पुन्हा पहाटे उठून तिखट-मिठाच्या पुऱया किंवा मग बटाट्याची भाजी आणि पोळी असं काहीतरी करायची. प्रवासात, आई हे खाणं बरोबर घ्यायची..असा आवडता खाऊ असतानाही, स्टेशनवर फिरणाऱ्या फेरीवाल्यांची भूरळ न पडणं अशक्यच...आई अर्थातच काहीही घेत नसे..फार -फार तर लेमनच्या किंवा श्रीखंडाच्या गोळ्या !! अगदीच हट्ट केला तर मात्र पाठीत एक धपाटा मिळायचा ! पण आईने घ्ररून घेतलेला खाऊ भरपूर असल्याने, आईचा फारसा राग येत नसे..
आम्हाला बसवून दिले, की बाबा मामाला ऑफीसमध्ये फोन करुन आम्ही कितीच्या बसने येतोय आणि त्या बसचा नंबर कळवायचे. मग स्टॅंडवर मामा घ्यायला यायचा. एक वर्ष मात्र गडबड झाली. आम्ही ज्या एस.टी. ने येत होतो, ती एस.टी. घाटातच बंद पडली..घाटात फोन वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुसरी एस.टी. बस येईपर्यंत थांबण्याला पर्याय नव्हता.एक तासाभराने दुसरी बस आली. आमची पहिली बस, पुणे स्टेशनला जाणार होती. आणि ही आत्ता आलेली बस स्वारगेटला जाणार होती. हा मोठाच प्रॉब्लेम झाला. मामा स्टेशनला थांबणार आणि आम्ही स्वारगेटला उतरणार.. ते ही एक-दीड तास उशीरा...त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, त्यामुळे मामाला कळवणे अशक्य होते. शेवटी आम्ही स्वारगेटहून थेट घरी गेलो. पोहोचेपर्यंत आठ वगैरे वाजले.बिचारा मामा ! आमची गाडी वेळेवर न पोहोचल्याने जाम टेन्स झाला. एक तास भर वाट बघून त्याने डेपोत चौकशी केली. तिथे त्याला ही भानगड समजली. आत्तापर्यंत आम्ही घरी गेलो असू या विचाराने मग तोही घरी आला. प्रवासाच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत..
................................................................
मला तीन मावश्या. त्यातल्या दोघी पुण्यात.. एकतर मामाच्या अगदीच जवळ रहायची. आणि दुसरी शुक्रवार पेठेत...तिसरी मावशी, दहीवडीला रहाते. (दहीवडी, साताऱ्यात आहे.) आमचा मुक्काम सगळ्यात आधी मामाकडे ! आम्ही आल्यावर किंवा आमच्या आधीच दहीवडीची मावशी आलेली असायची.

सोमवार, १६ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - ३


दुपारच्या कडक उन्हामुळे, बाहेर खेळणं अशक्य असायचं. मग कुणाच्या तरी घरी जमून बैठे खेळ खेळण्याला पर्याय नसायचा. त्यातही आई कधीतरी बळजबरीने झोपवायची, पण आईला झोप लागली की आम्ही हळूच सटकायचो. आमची क्वॉर्टर एकदम प्रशस्त होती. तीन मोठ्या रूम्स, पुढे गॅलरी, आणि मागे मोठा पॅसेज होता. कुणाकडे ही जमलो, तरी मागच्या पॅसेजमध्ये आमचा अड्डा असायचा. पत्ते, कॅरम, चंपल, किंवा अगदीच कधीतरी काचापाणी असे कुठलेही खेळ चालायचे. एका सुट्टीत बाबांनी आम्हाला बुद्धीबळ शिकवले आणि मग कित्येक दिवस बाकीचे खेळ बाजूला पडले. समोरच्याचे सैन्य मारताना काय सॉलिड मजा यायची !! शनिवारी मामाकडे गेले होते..माझा मामेभाऊ सहावीत आहे..तो नुकताच बुद्धीबळ शिकलाय.. त्याच्यासाठी म्हणून खूप वर्षांनी पुन्हा बुद्धीबळ खेळले आणि त्याने चक्क मला हरवले!
आमच्या बिल्डींगसमोरच मोठे मैदान होते. संध्याकाळ झाली की, मग तिकडे खेळ स्रुरु..तिथे कायम वेगवेगळ्या ३-४ ग्रुपचे खेळ सुरु असायचे..लगोरी, लपंडाव, खो-खो, आट्या-पाट्या, बॅडमिंटन..आणि बरेच काही..अगदी अंधार होईपर्यंत बाहेर खेळणं सपंत नसे...
आमच्या घरापासून भायखळा जवळ होते.. त्यामुळे कधीतरी संध्याकाळी, राणीच्या बागेत चक्कर व्हायची...तिथे प्राणी बघत फिरणं, म्हणजे मस्त टाईमपास असायचा.
रात्रीचे जेवण झाले की, आम्ही चक्कर मारायला जायचो. घरात फारच गरम व्हायचं. मोकळ्या हवेत चक्कर मारुन आलं की मस्त झोप लागायची. कधी सातरस्ता, तर कधी महालक्ष्मी स्टेशन.. तर कधी कधी चिंचपोकळी...चिंचपोकळीची आठवण झाली की, मला आठवतात ती तिथल्या रेल्वे पुलाखालची घरे... घरे कसली.. झोपड्याच असायच्या त्या... इतक्या छोट्या... पण त्यातही त्या लोकांकडे कलर टिव्ही, फ्रिज वगैरे वस्तू असायच्या.. मला फार आश्चर्य वाटायचं त्याचं..
................................................................
मे च्या दोन-तीन तारखेला रिझल्ट लागायचा...त्या आधीच बाबा आमच्यासाठी, एस.टी., किंवा रेल्वेचे रिर्झवेशन करुन ठेवायचे...
(क्रमश:)

बुधवार, ११ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - २

रविवारी उन्हं उतरल्यावर, आम्ही फिरायला जायचो. आमच्या क्वॉर्टरस आर्थररोडला (दक्षिण-मुबंई) होत्या. बाबा त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईला रहात असल्याने, त्यांना मुंबईची बरीच माहिती आहे. फिरायला जायचं ते अर्थातच, बेस्टच्या बसने. बसने फिरण्याचेही भारी आकर्षण असायचे तेंव्हा !! त्यातही डबल बसचे फारच !! कुठेही जाताना डबल बस मिळाली की वरच्या भागात बसायला एकदम मस्त वाटायचं. वरच्या भागात जाऊन सगळ्यात पुढच्या सीटवर बसायला, मला फार आवडायचं. अजुनही आवडतं. त्या सीट वर बसून अगदी थेट बससमोरचा रस्ता आणि त्याबरोबरच दोन्ही बाजू बघता येतात.. अगदी मस्त वाटतं उंचावरुन ते बघायला....
तीन वर्षात, बाबांनी आम्हाला दक्षिण मुंबईतील बरीच ठिकाणे दाखवली. वर्षभर या ना त्या कारणांमुळे फिरणं कमी व्हायचं. पण एकदा सुट्टया सुरु झाल्या की मग, आम्ही तिघी फिरण्यासाठी बाबांच्या मागे लागायचो. गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, गिरगाव चौपाटीजवळचे मत्सालय, हॅंगिंग गार्डन, वरळी, महालक्ष्मी...सारं काही..
गिरगावातील मत्सालयातले विविध प्रकारचे,नाना रंगांचे माश्यांचे निरीक्षण करताना वेळ कसा जायचा कळायचे नाही. मग सुर्यास्ताच्या वेळेस, चौपाटीवर यायचं, लाटांमध्ये मनसोक्त खेळायचं. जरा आत गेले की आई रागवायची, पण आईची नजर चुकवून आम्ही मोठ्या लाटा अंगावर घेउ पहायचो. सुर्यास्त होईपर्यंत चौपाटीवर खेळून मग घ्ररी परतायचो.
एखाद्या रविवारी हॅंगिंग गार्डनला जायचो. मलबार हिलचा परीसर एकदम पॉश ! तिथे फिरताना, आजुबाजूचे बंगले न्याहाळणे हा आमचा आवडता उद्योग! गार्डनमध्ये वेळ कसा जायचा हे कळायचे नाही. पाचवी-सहावीत असताना, त्या बागेचे फार आकर्षण होते, विशेषत: म्हातारीचा बूट !!
गेट वे ला गेलं की, बोटीत बसायचचं हे तर ठरलेलंच असे. मला आठवतयं, एका सुट्टीत आम्ही एलिफंटा केव्हस बघायला गेलो होतो. तिथे बघण्यासारखे काही नव्ह्ते, पण तरी तिथे जाण्यासाठी बोटीतून एक तास फिरायला मिळाले यातच जास्त आनंद होता.
................................................................
वाळवणाची कामे संपली की, पूर्ण दिवस उनाडक्या करण्यासाठी रिकामा असायचा. आता ओढ लागायची, ती पुण्याला जायची ! पण रिझल्ट लागेपर्यंत मुंबईत थांबावेच लागे...
(क्रमश:)

शुक्रवार, ६ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - १

एप्रिलचा महिना उजाडलाय.. छळवादी वार्षिक परीक्षा संपत आलेल्या आहेत किवां संपल्या आहेत.. आणि सगळीकडे उन्हाळी सुट्ट्यांचे वेध सुरु झालेले आहेत. माझी साडेपाच वर्षांची चिमुरडी भाचीही काल जाम खुश होती...काल तिच्या शाळेचा शेवटचा दिवस होता.. आणि आता दोन महिनॆ शाळा नाही हे कळल्यामुळे स्वारी एकदम आनंदात होती..मला क्षणभर तिचा फार हेवा वाटला !! नोकरी सुरु झाल्यापासून, उन्हाळी सुट्ट्यांचे सुख अनुभवता येत नाही, पण तरीही, शालेय जीवनातील आठवणी अजुनही मनात घर करुन आहेत.
परीक्षा सुरु असतानाच आई वाळवणाची कामे सुरु करायची..पापडासाठी उडीद दळून आणले जात.वेफर्स साठी आई मोठे मोठे बटाटे आणायची. महिन्याच्या सामानाच्या यादीत, साबुदाणा, गहु नेहमीपेक्षा जास्त लिहिला जायचे...
ही सगळी तयारी होईपर्यंत, परीक्षा संपायची.. आणि मग सुरु व्हायचे एक एक वाळवणाचे पदार्थ ! पलंग, घरातून अगंणात यायचा...आम्ही तळमजल्यावरच रहायचो, त्यामुळे पलंग रोज आतबाहेर करताना फार त्रास नाही व्हायचा. पण वरच्या मजल्यवरच्या काकू लोकांचे फार हाल व्हायचे. मग एखाद्या दिवशी आमचे काम नसेल तर आमचा पलंग त्यांना दिला जायचा.
सगळ्यात आधी सांडगे घालून श्रीगणेशा केला जायचा आणि त्यानंतर मग साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापडया, बटाट्याचे वेफर्स,कीस, साबुदाणा आणि बटाटयाच्या चकल्या अशी उपवासाची बेगमी व्हायची. वेफर्स वाळत घालताना, आम्हा बहिणींची स्पर्धा स्रुरु व्हायची, कोण किती वेफर्स वाळत घालू शकते? यावर वाद व्हायचे...आईला हे हवच असायचं, कारण त्यामुळे, काम भरभर उरकली जात. ज्या दिवशी पदार्थ केला जायचा, त्या संध्याकाळी तो पदार्थ आई तळायची, आणि त्याची अर्धवट वाळलेली चव काही वेगळीच लागायची.
हे सारे सुरु असताना आई मधेच एक दिवस कुरडया करण्यासाठी गहू भिजवायची. मग आम्ही दिवस मोजायचो.. चिक कधी खायला मिळेल याची वाट बघणं सुरु व्हायचं. दोन दिवसातच घर ओल्या गव्हाच्या आंबूस वासाने, भरुन जाई. खंरतर कुरडया करणं हे फार कष्टाचे काम ! चिक हाटणं, तो गरम असतानाच त्याच्या कुरडया करणं, हे सारं मला फार अवघड वाटतं. चिक हाटण्यासाठी दोन माणसे लागायची, त्यामुळे आईला शेजारच्या काकू मदत करायच्या.. आमची मदत फक्त खाण्यासाठीच.. फारफार तर, सोयामध्ये चिक भरुन देण्याचे काम आम्ही करायचो..गव्हाचे थोडेसे दूध आई ठेऊन द्यायची. कुरडया करुन झाल्यावर शेवटी, आम्हा सगळ्यांना खाण्यासाठी त्या दुधाचा आई चिक करायची.. गरम चिक, तूप आणि साखर घालून इतका स्वादिष्ट लागायचा !!
कुरडया झाल्यावर, पापडांची तयारी सुरु व्हायची. पापड करताना सगळ्यात जास्त मजा यायची. पापड करणे हे खरतर खूप वेळखाऊ काम! पण पापड करायला आसपासच्या आईच्या मैत्रिणी, आमच्या मैत्रिणी एकत्र जमायचो. ज्याचे पापड करायचे, त्याच्या घ्ररी धुमाकूळ ! सकाळी अकरा ते एक आणि मग दोन ते पाच - साडेपाच, पापड करताना गप्पांचा नुसता खच पडायचा. पापड करता करता एखादी लाटी, तेल लावून तोंडात टाकली जायचीच! ज्यांचे पापड करायचे, त्यांच्याकडे दुपारचे जेवण आणि चारचा चहा!! सगळ्यांचे पापड होईपर्यंत हे सुरु रहायचं.
ही सगळी कामं करायची, ते रविवार सोडून ! रविवारी, बाबांना सुट्टी !! तो दिवस फिरण्यासाठी राखीव असायचा...
(क्रमश:)