रविवार, १७ डिसेंबर, २०२३

रडणारे मूल

रविवारची भर दुपारी 12/12.30 ची वेळ. सूर्य डोक्यावर आलेला. हिवाळा असल्याने ऊन सुसह्य होते. FC रोड वर वाहने व माणसे यांची गर्दी होती. तरुण तरुणी दुकानांच्या बाहेर घुटमळत होते.
वैशाली, रुपाली, वाडेश्वर एवढेच नव्हे पोटपुजेचे सगळे outlets ओसंडून वहात होते. गप्पा रेंगाळल्या होत्या. रविवार चा निवांत पणा वातावरणात उबदार आणि हवाहवासा वाटत होता. एकंदर खाणे-पिणे-खरेदी- विक्री यांची रेलचेल होती..पैसे खुळखुळत होते..QR code झटपट स्कॅन होत होते.

मनवा तिचा गाण्याचा तास संपवून बाहेर पडली. गाण्याचा क्लास FC रोड वर असला तरी थोडा आतल्या बाजूस एका छोट्या गल्लीत होता. दर रविवारी सकाळी 10 च्या आसपास ती इथे यायची. दुचाकी रोडवर पार्क करून आत चालत जायची. दर रविवार चा हा शिरस्ता तिने आज ही पाळला होता. 
FC रोड वरची दुपारची वर्दळ तिला सवयीची होती. एक वासुदेव महाराज आपली प्रभात फेरी संपवून पोटपूजा करण्यासाठी restaurant शोधत होते. खिशातल्या पैशांची मनातल्या मनात चाचपणी करत होते. त्यांचा तो आगळा वेष रस्त्यावरच्या कुत्र्यांना न झेपल्याने त्यांनी आक्रमणाचा पावित्रा घेतला होता आणि ती भुंकायला सुरू झाली होती. त्यांना मागे टाकून मनवा पुढे चालत गेली. Good luck चौकात सिग्नल लागला की रुपाली chya चौकात रस्ता ओलांडून आगरकर रोड वर यायला सोपे जाते. ही वेळ साधण्याची कला मनवां ने सरावाने आत्मसात केली होती. गाडीकडे चालतानाच तिने पाहिले की गाड्यांची वर्दळ कमी झाली आहे आणि आता पटकन गाडी काढून रस्ता ओलांडावा हे बरं ! 
पण गाडीपाशी येऊन पहाते तो काय ! एक मूल गाडीच्या मागच्या बाजूला रडत बसले होते. आठ नऊ वर्षांचे तरी असेल. बाजूला दोन फळकुट पडले होते. तो मुलगा असा रडत बसलेला पाहून मनवा ला वाईट वाटले. काय रे का रडतो आहेस? तिने त्याला जवळ जाऊन विचारले. काळे बेंद्रे, काळवटल्येल्या कपड्यामधले ते पोर..अंग मातकटलेले..केसाला किती दिवसात तेल पाणी मिळाले नव्हते कुणास ठाऊक..केसाला काय त्याच्या अंगाला ही किती दिवसात पाणी लागले नसेल त्याला ही आठवत नसेल.. मनवाने त्याच्या खांद्यावर ठेवण्यासाठी नेलेला हात नकळत मागे घेतला..शक्य तितक्या प्रेमाने ती त्याला रडायचं थांबण्यासाठी विनंती करत होती. तो हलल्याशिवाय गाडी निघणे अशक्य होते. तिने त्याच्या जवळ पडलेल्या फळ्या पायाने लांब ढकलल्या. पण हा पठ्ठा काही हलेना. त्याच रडू ही थांबेना.. मनवां ने गाडी काढली की लगेच आपली गाडी तिथे लावावी या हेतू ने एक जोडप येऊन थांबलेलं.. ते ही खोळंबल. मग तो बाईक वाला, त्याच्या गाडीवरून उतरला. त्याने गाडी साईड स्टँड ला लावली आणि आता तो ही ह्या रडक्या मुलापाशी येऊन त्याला सरकण्यासाठी अर्जव करू लागला. अशा रस्त्यावरच्या मुलाला जवळ घेणार तरी कोण..आणि त्याला शांत तरी कोण करणार ! स्वच्छतेचे बुरखे ओढून घेतल्यावर माणुसकी ही स्वच्छतेचे नियम पाळून वागू लागते..
आता रस्त्यावर एक छोटा प्रेक्षणीय प्रसंगच उभा राहिला होता. येणारे जाणारे लोकही वळून पाहू लागले. 
शेवटी बाईक वरून उतरलेल्या तरुणाने नाईलाजाने त्याचे खांदे धरले आणि एका बाजूला बसवले.
ह्याच रडणं तरी ही सुरूच ! त्या तरुणाने मनवाची गाडी एका बाजूने काढली..तिच्या ताब्यात दिली...स्वतःची गाडी लावली आणि आपल्या सखी सोबत तो निघून गेला..
मुलाचं रडणं सुरूच.. इतक्यात मागून एक आवाज आला..' ए....काऽऽय चाललय रे तुझं..'?? मुलाला तो आवाज ओळखीचा होता बहुतेक..त्याने चमकून वर पाहिलं..डोळ्यातलं पाणी आणि तोंडातून विव्हळण सुरूच.. समोर टपरीवर गळ्यात सोनेरी साखळ्या..( की साखळदंड..) घातलेला..दोन्ही हाताच्या बोटांमध्ये जाडजुड अंगठ्या घातलेला..केसांचा चित्रविचित्र कोंबडा केलेला कोणी दादा महाराज अवतरला होता !
आता मात्र ते रडणार मुल सावध झालं. क्षणात त्याचा सुर बदलला.. आवाज कमी करून ते हाताचे कोपर चोळू लागले... मनवा सारे न्याहाळत होती. तिचा पाय तिथून निघेना आणि काय करावे हे ही सुचेना. 
त्या मुलाने एक दोन मिनिटे कोपर चोळले. तिला दिसले की त्याला तिथे खरचटले होते..बहुतेक त्या फळ्या त्याच्या होत्या आणि त्या फळ्यामुळे त्याला लागले असावे. शर्टाच्या बाहिने त्याने नाक आणि डोळे पुसले. मागे उभ्या असलेल्या दादा महाराजांकडे पाहिले आणि शेवटी एकदाचा तो जागेवरून उठला. तिने पुढे सरकवून ठेवलेल्या फळ्या त्याने उचलल्या आणि उभ्या केल्या.. त्याच्या दुप्पट उंचीच्या फळ्या खांद्यापाशी तिरक्या धरून तो डेक्कन कडे चालत गेला ! मागे थांबून मनवा त्याच्याकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिली..की तिच्या डोळ्यातल्या पाण्यामुळे तो तिला दिसत नव्हता..?!

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

ये रे घना..

ती ऑफिसला निघाली होती. आज जरा जास्तच उशीर वागला होता. घड‌याळ पुढे आणि ती मागे.. पळापळ नुसती! हुश्श! एकदाचे कुलूप लावून ती घराबाहेर पडली. डोक्यावर शिरस्त्राण चढवून तिने दुचाकी काढली आणि हा दत्त म्हणून हजर!


'अरे! ही काय वेळ आहे का यायची ? आधीच ऑफीसला उशीर झालाय.. आत्ता नको बाबा माझा वेळ खाऊस..'  तिला कटकट झाली..

ती तशीच निघाली आणि तिच्या समवेत तो ही ! 'संध्याकाळी का नाही आलास ! तेव्हा कसं निवांत भेटता येत मला.. मनसोक्त भटकता येते. हव तिथे तुझ्यासह फिरता येत!


"आत्ता म्हणजे धड हो ही म्हणवत नाही..आणि नाही ही!


बोलता बोलता ती गाडी चालवत होती सुरुवातीला शांत हळूवार असलेला तो आता फारच अवखळ झाला होता. गाडी चालवताना तिला छळत होता. त्रास होत होता तरीही छानच वाटत होतं तिला त्याचे अस हे छळणं!


त्याच्या ही सहवासात तिला कायमच मस्त वाटायचे.


आत्ताही ऑफिसच्या वाटेवरचे ट्रैफिक पार करून अर्धा तास कसा गेला तिला कळलेच नाही. त्याने तिला पूर्ण वाटेत सोबत केली.. नको नको म्हणत तीही त्याच्या सहच येत होती.


गाडी पार्किंगमध्ये घेता घेता आणि त्याचा निरोप घेताना तिच्या हेही लक्षात आले नाही की त्याच्या बरोबर येता येता तिचा पार अवतार झाला होता ! 

त्याच्या भेटीत ती इतकी एकरूप झाली होती की तिचे मन गुणगुणत होते... ' ये रे घना ये रे घना.. न्हाऊ घाल माझ्या मना...!!'

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

ऋतू बदल

टेकडीवर चे गवत फुल,

कोवळ्या उन्हात डोलते आहे..

हिरव्यागार गवताशी गूज गोष्टी करत आहे..


आत्ता तर पाऊस सुरू होता..

आत्ता तर टेकडी चिंब भिजत होती..

आत्ता तर माळरान सारे

ओले गच्च नी दाट ढगाळ होते..


कोण येऊन गेले, त्याने काय जादू केली,

रूपडे नवे टेकडीला बहाल करून गेले !


लुसलुशीत नव्हाळी हिरवी पाती,

पिवळी, गुलाबी, जांभळी, निळी फुले..

रंगाची उधळण चहुकडे !!!


धुक्याची दुलई अन हरवलेल्या वाटा..

टेकडीला भेटण्या जीव आसुसला..

भटकावे निरर्थक आणि रेंगळावे इथे तिथे

जगण्याचे अर्थ पुन्हा नव्याने शोधावे !




शनिवार, २७ मे, २०२३

वेताळ टेकडी वर उन्हाळी सकाळ


टेकडीवर पोहोचलं की बाकीच्या जगापासून आणि रोजच्या रहाटगाडग्या तून मी खूप लांब जाते.सारे मुखवटे गळून पडतात आणि वय ही..
मी आणि शिरीष गेले कित्येक महिने नियमित वेताळ टेकडीवर फिरायला जातो..
प्रत्येक वेळेस वेगळीच टेकडी अनुभवायला मिळते. 
गुलाबी फुलांच्या बहरात नाहून गेलेली टेकडी मागच्या महिन्यात हळूहळू बदलायला लागली..निराळं रूप ल्यायला लागली. 
या वेळेस गेलो होतो तेव्हा चतुर्शुंगी chya वाटेची आठवण आली. खूप दिवसात तिकडे फिरकलो नव्हतो. ही एक वेगळीच गम्मत आहे टेकडी ची..दर वेळेस कुठली तरी वेगळीच वाट गवसते..आणि नव्या वाटा धुंडाळत फिरताना आपण टेकडी चे आणि ती आपली कधी होते कळत नाही. 
होळी होऊन गेली आहे आणि उन्हाचा चटका सुरू झालाय चांगला च.. सकाळची वेळ असली तरी उन्हाने रापलेल्या माती cha ek खरपूस वास हवेत जाणवत होता. आणि त्याच्या सोबत वाळलेल्या पानांचा, फांद्यांचा आणि कुठे कुठे पालवी फुटू लागली होती त्याचाही..ढगाळ हवा होती त्यामुळे थोड कुंद होत वातावरण..
निष्पर्ण झालेल्या झाडांमुळे एरवी लपलेल्या जागा, वाटा समोर येत होत्या.  अनावश्यक ते सारं सोडून नव निर्मिणारी ती कुणी योगिनीच होती जणू..
खाण सोडून उजवी कडे वळून आम्ही पुढे निघालो..जाताना  रांगेने उभ्या  असलेल्या चाफ्याच्या झाडांना दुर्लक्षून जाणं अशक्य ..तरी अजून गुलमोहोर यायचा आहे..

आम्ही चतुर्शुंगी chya वाटेवर भटकत  पुढे जात होतो.. लॉयला कॉलेज चा view दिसतो तिथे पर्यंत जायचं असं ठरलं..मध्येच कुठे तरी पांढरी रान फुले उमलली होती. त्यांचा वास श्वासात भरून घेतला..एका उंचवट्यावर पोहोचलो तर टेकडीच इतकं मोहक उनाड, रानटी रूप सकाळच्या कोवळ्या प्रकाशात..ढगाळ वातावरणात अप्रतिम सुंदर दिसत होत..वाळलेल्या गवताच्या इतक्या छटा..त्यात भर म्हणून निष्पर्ण झालेली आणि केवळ शेंगा..बिया उरलेली काही झाडे..काटेरी झाडांना आलेले फुलोरे..आणि मोकळं आकाश..त्यात मुक्त विहार करणारे पक्षी..  तुमचं भान हरपल्या शिवाय राहील?

---------------
टेकडीवर शनिवार रविवार बरीच गर्दी असते. पालकांसोबत येणाऱ्या मुलांपासून सत्तरीच्या तरुणांपर्यंत..असे वेगवेगळ्या वयोगटातले कित्येक जण गटाने किंवा एकटे फिरायला येतात. काही जण ध्यान लावून बसलेले दिसतात..
टेकडीवर फिरायला येणारी ही सारी गर्दी एका ठराविक परिघा नंतर विरळ होते. वेगवेगळ्या दिशांना पांगते.  लांबवर चालणारी माणसे एखाद्या किडा मुंगी इतकी किरकोळ जाणवतात..आपले अस्तित्व ही त्याहून फार वेगळे नाही हे टेकडीवर निसर्ग अनुभवताना जाणवत राहते.
फिरत फिरत आम्ही बसायला चांगला कातळ शोधला आणि तिथे पोहोचताना अचानक एक विहीर दिसली..अरेच्चा..इतके दिवस येतोय..आजच कशी दिसली ही? आजूबाजूचे गवत वाळून गेल्यामुळे की काय आम्हाला त्या दिवशी प्रथमच ती जाणवली. 
विहिरीकडे जाताना डोकंवायचे ठरवून आम्ही त्या कातळावर स्थिरावलो. वेताळबाबा chya देवळाचा झेंडा लांब फड फडत होता.. खाली शाळेच्या ग्राउंड वर मुले खेळत होती.. वर  पाहिले तर नजरेत दूर दूर पर्यंत मोकळे आकाश  दिसत होते. मध्येच एक दोन टिटव्या शिळ घालून जात होत्या.  सन बर्ड्स भटकत होते..आमच्या जवळपासच लगबगीने मुंग्या इकडे तिकडे करत होत्या.. सारे कसे निवांत निश्चल वाटतं होते. घेशील किती दोन करांनी..तसे पाहशील किती दो नयनांनी..असे होऊन जाते अशा वेळेस.. पंचेंद्रिये जितके जमेल, जसे जमेल तसे अनुभवण्याचा यत्न करतात..जीवाला एक वेगळीच शांतता लाभते..भान हरपून आम्ही तिथे बसून राहिलो..किती वेळ गेला कुणास ठाऊक..मग कधीतरी आम्ही उठलो..विहिरी कडे निघालो..

विहिरीकडे जाणारी पायवाट कुठे तरी हरवली होती गवतात...  शिरीष सोबत असं टेकडी भटकताना, माझ्यातल लहान मूल डोकं वर काढतं.. मग ह्या दोन मुली निघाल्या उतारावरून...गवतातून  वाट शोधत..विहिरीचं पाणी काही विशेष स्वच्छ नव्हतं..पण उन्हाळ्यात पक्ष्याना आधार देत असणार ही विहीर..
सूर्य उगवती कडून आता बराच वर आला होता..घरची वाट शोधणं अनिच्छेने का होईना क्रमप्राप्त होते..टेकडी वरून पाय निघणं खूपच अवघड असते.. विहिरिकडून चढून वर आलो आणि एक अतिशय सुंदर पक्षी दिसला..आम्ही दोघी पहिल्यांदा च पाहत होतो. तो हिरव्या रंगात सामावून जाणारा, लांब शेपटीचा, बुलबुल एवढा  पक्षी होता..पण ग्रीन बी इटर नव्हता ..मग पाहिले तर जोडीने फिरत होता तो..

आता मात्र पावले उचलत आम्ही निघालो..खाण मागे पडली..एका तिठ्यावर गुलाबी रंगाची रानटी फुले( की कळ्या ?)काटेरी झुडूपावर आली होती.. दुर्लक्ष करून जाणं अशक्यच..मग रेंगाळलो तिथे क्षणभर ..

अगदी शेवटच्या वळणावर सगळी झाडे निष्पर्ण झाली आहेत सध्या.. त्या झाडीत अचानक हालचाल जाणवली..म्हणून पाहिलं तर एक मोर दर्शन देत होता.. अहाहा..अजून काय माणसाला टेकडीवर आल्यावर...

शेवटी गाड्या निघाल्याच आमच्या..आणि निघता निघता पुन्हा आम्ही एका भडक गुलबक्षी बोगन वेली पाशी थांबलो च..

---------

टेकडी असे वेड लावते जीवाला...निसर्गाच्या प्रेमात पाडते..आपल्या न कळत आपण तिचे होऊन जातो.. प्रत्येक ऋतुत नवं रूप घेते ती..नव्याने भुरळ घालते... आणि पुन्हा पुन्हा आपण तिच्या ओढीने जात राहतो वेताळ टेकडीवर..नव्या वाटा, जाळ्या गवसत जाताना..स्वतःला ही नव्याने सापडत जातो..


सोमवार, १ मे, २०२३

आई आणि करीयर


आईचा खूपदा होतो संघर्ष तिच्यातल्या करीयरीस्टिक व्यक्तीशी..
संध्याकाळी दमून आलेलं तिच बाळ..
आणि नेमकी त्याच वेळेस आलेला क्रिटिकल कस्टमर इश्यू..!
कधी गुडघे फुटल्यावर फोनवरच रडारड
आणि महत्वाच्या मीटिंग मधून बाहेर येऊन तिने घातलेली फुंकर..!
रात्री बेरात्री लॅपटॉप समोर बसताना
एक ब्रेक घेते ती, एकटं झोपणाऱ्या बावरणाऱ्या लेकासाठी..
थापटताना त्याला, ती मात्र ppt मधल्या content मध्ये नकळत शिरते...
पिलू घरट्यात ठेवून ती करते परदेशवारी..
आणि व्याकुळता घेऊन झोपते उशाशी..!
प्रेम आणि जबाबदारी...
वैयक्तिक आकांक्षा आणि मातृत्व भावना..
कधी अपराधी, कधी समाधानी..
ती हेलकावे घेत रहाते त्या लंबकासोबत..!!
हल्ली बाळ मोठं झालंय..स्वतंत्र आणि शहाणं झालं आहे
कामात गुंतताना ती समजूत घालत राहते स्वतः चीच...
आणि नेमकी त्याच रात्री
मुलाला आठवते तिची उबदार कुस
शांतपणे पहुडण्यासाठी !!

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

मुक्तबंध

खोल खोल रुजली बीजे
त्यांचे वृक्ष घनदाट झाले
सावलीत त्यांच्या
मैत्र तुझे माझे फुले

गळून गेली कितीक 
जीर्ण नकोशी पाने
हळुवार सुखद क्षणाचे 
नवे धुमारे झाले

उष्ण वारे भोवताली
वाहतात ऋतुमानाने
शीतल हलकी फुंकर एकच
त्यावर उतारा पुरे..

फांद्या फुटल्या अस्ताव्यस्त
गुंतल्या परस्परात इतक्या,
तुझे माझे श्वास तरीही
मुक्त मोकळे ओघवते..

मुक्ति कशास आता,
हे बंध हवे हवेसे
पाखरांनी घेऊन भरारी 
या वृक्षाशी सायंकाळी निजावे !

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

प्रिय जीवन सख्यास..

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, आयुष्यभर  हातात हात घेऊन सुख दुःखाना सामोरे जात जगणाऱ्या प्रत्येक जोडप्यांना माझा सलाम..!
असे जीवन साजरे करताना, माझ्या आई, मावशी, काकू chya पिढीतील स्त्रियांच्या मनातील भावना या कवितेत टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
------------
संसार हा माझा, संसार हा तुझा
दरवळ हा जसा बकुळ फुलांचा पसरतो.

तुझ्या सवे सखया ही चढण चढून आले
वळणावर सुख दुखांच्या हातात हात आहे.

जपलेस तू मला जीवापाड किती,
अव्यक्त प्रेम तुझे, क्षणो क्षणी जगते आहे.

गुंफलो आपण असे, श्वास ही एक झाला
गाण्यातल्या माझ्या, हरेक सुर तुझा झाला..

जीवन माझे अवघे तुझ्या भोवती गमते,
तृप्तता ही मला अमृतातीत लाभते.


सोमवार, ३ एप्रिल, २०२३

गोष्ट


माझ्या आजू बाजूस,
किती आयुष्य वेगवेगळी..
प्रत्येकाची एक गोष्ट आपापली..
कधी कोणी न ऐकलेली !
ज्याच्या त्याच्या काळजात खोल दडून बसलेली...
प्रत्येकाची एक गोष्ट..!

गहिऱ्या नात्यांची, 
सुखाच्या उन्हासोबत
गडद दुःखाच्या सावल्यांची..
प्रत्येकाची एक गोष्ट..!

दबलेल्या भावनांची,
अपुऱ्या इच्छांची,
साठलेल्या स्वप्नांची,
अन् डोळ्यात अटलेल्या अश्रूंची..
प्रत्येकाची एक गोष्ट..!

जबाबदारी पेलणाऱ्या खांद्यांची,
कष्ट केलेल्या हातांची,
पायपीट करणाऱ्या पायाची
आणि भोगलेल्या देहाची..
प्रत्येकाची एक गोष्ट..!

सहाले ल्या अन्यायाची,
भोगल्येल्या डागण्याची,
परिस्थितीच्या रेट्याची,
काळाच्या गरजेची..
प्रत्येकाची एक गोष्ट..!

किती गोष्टी अशा,
न ऐकलेल्या..
जाणीवा सांगू पाहतात..
अस्वस्थ मनाची
गोष्ट त्या जन्माला घालतात..!!

जखमा


काचा लागलेल्या जिव्हारी..
रुतून बसल्या खोल किती,
ठसठसते इतके आता
हलक्या ओरखड्यानी !


दोष इतकाच माझा
मी प्रामाणिक राहिले होते,
भावनांचे दार माझ्या
सताड उघडे टाकले होते..

दोष इतकाच माझा
मी वार झेलत होते,
प्रत्येक लढाईत
शस्त्र ठेवत होते

दोष इतकाच माझा
मी आशावादी होते,
बदलेल परिस्थिती
म्हणून वाट पाहत होते !

दोष इतकाच माझा
जाणीव अन्यायाची होती,
सांभाळण्याचे स्वतःला
शहाणपण मात्र नव्हते

काढू कशा कळेना
काचा हलक्या हातानी,
काचा पाणी चा खेळ हा
खेळून जिंकू मी कशी..

बुधवार, १५ मार्च, २०२३

अलविदा..

काही गोष्टी, माणसे तुमच्या पासून दुरवताना किंवा दूर गेल्यावर अचानक त्याविषयी उमाळा दाटून यावा, तसे काहीसे माझे आमच्या कार chya बाबतीत झाले आहे.
खूप दिवसा पासून नवीन कार घ्यायच्या चर्चा घरात रंगत होत्या..शोरुम chya भेटी सुरू झाल्या होत्या..नव्या गाडी chya उत्साहात गेले 14.5 वर्षे जी आमच्या सोबत आहे त्या स्विफ्ट विषयी फार काही भावना जाणवल्या नव्हत्या. ती विकायचे हे नक्की होते..
आणि काल अचानक च तिचे deal फायनल झाले.. नवरा म्हणाला..उद्या संध्याकाळी गाडी जाणार..आणि एकदम च उदास वाटू लागले. नकोच ती विकायला असे विचार येऊ लागले. पण दुसरा पर्याय ही नव्हता..

आमच्या दुसऱ्या दिवाळी ला आली होती ती.. आमची पहिली मोठ्ठी खरेदी..

कार चालवता यावी म्हणून मी दुसऱ्यांदा शिकवणी लावली.. त्या नंतर रात्री नवऱ्या सोबत सराव सत्र सुरू झाले.. या गाडी बाई चे तंत्र काही औरच..
क्लच, ब्रेक, गिअर सांभाळा..स्टिअरिंग ताब्यात ठेवा..आणि आकाराचा अंदाज घ्या..आणि हो रस्त्यावर वाहने, माणसे आणि समस्त प्राणी पक्षी जात ही फिरते त्याचा अंदाज घ्या..मागे, पुढे, उजवीकडे, आणि डावीकडे ही..तुम्ही अष्टावधानी नाही झालात तर नवल...

पण मी अर्थातच तशी नव्हते.. असो..माझ्या कार शिक्षणा ची कथा पुन्हा कधी तरी.. तर तिच्याशी थोड्या झटापटी करून झाल्यावर आणि नवऱ्याने पुरेसे सहनशील राहूनही माझे तिचे सुत चालक म्हणून काही जुळेना.

तशात च थोड्याच दिवसात बाळाची चाहूल ही लागली.. आणि मग तिच्या सोबत वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली..सातव्या महिन्यानंतर नवऱ्यासोबत अलगद ऑफिस ला पोहोचायची मजा काही वेगळीच होती.

स्विफ्ट मधून मी दोन जीवाची दवाखान्यात गेले होते आणि लेकाला घेऊन घरी आले होते.

किती प्रवास केले.. पहिला महाबळेश्वर प्रवास..मुंबई..आंबोली..सातारा..गोवा.. रत्नागिरी..भंडार दरा..किती आठवणी !

मध्येच कधीतरी मी प्रयत्न पूर्वक ती चालवायला शिकले आणि मग मिरवली पण खूप ठिकाणी..आणि त्या चालवण्याचे किस्से ही खूप घडले.

अडी अडचणीत कार खूपच कामी केली..आईंचे ऑपरेशनस्..अवेळी करावे लागलेले प्रवास.. सार स्विफ्ट मुळे सहज होत होत..

केदार ने तिला जपलं ही होत..त्यामुळे तिने कधी त्रास ही दिला नाही..

आता थोड्या वेळा पूर्वी कागद पत्रे , व्यवहार झाला आणि एव्हाना ती गेली ही असेल आमच्या पार्किंग मधून..

आमच्या आयुष्यात आला तसा आनंद अजून कुणाला वाटण्यासाठी तिचा प्रवास सुरू झाला आहे...

Good bye dear Swift.. MH 12 EX series आणि तुझा नंबर दोन्ही अविस्मरणीय आहे..