ती ऑफिसला निघाली होती. आज जरा जास्तच उशीर वागला होता. घडयाळ पुढे आणि ती मागे.. पळापळ नुसती! हुश्श! एकदाचे कुलूप लावून ती घराबाहेर पडली. डोक्यावर शिरस्त्राण चढवून तिने दुचाकी काढली आणि हा दत्त म्हणून हजर!
'अरे! ही काय वेळ आहे का यायची ? आधीच ऑफीसला उशीर झालाय.. आत्ता नको बाबा माझा वेळ खाऊस..' तिला कटकट झाली..
ती तशीच निघाली आणि तिच्या समवेत तो ही ! 'संध्याकाळी का नाही आलास ! तेव्हा कसं निवांत भेटता येत मला.. मनसोक्त भटकता येते. हव तिथे तुझ्यासह फिरता येत!
"आत्ता म्हणजे धड हो ही म्हणवत नाही..आणि नाही ही!
बोलता बोलता ती गाडी चालवत होती सुरुवातीला शांत हळूवार असलेला तो आता फारच अवखळ झाला होता. गाडी चालवताना तिला छळत होता. त्रास होत होता तरीही छानच वाटत होतं तिला त्याचे अस हे छळणं!
त्याच्या ही सहवासात तिला कायमच मस्त वाटायचे.
आत्ताही ऑफिसच्या वाटेवरचे ट्रैफिक पार करून अर्धा तास कसा गेला तिला कळलेच नाही. त्याने तिला पूर्ण वाटेत सोबत केली.. नको नको म्हणत तीही त्याच्या सहच येत होती.
गाडी पार्किंगमध्ये घेता घेता आणि त्याचा निरोप घेताना तिच्या हेही लक्षात आले नाही की त्याच्या बरोबर येता येता तिचा पार अवतार झाला होता !
त्याच्या भेटीत ती इतकी एकरूप झाली होती की तिचे मन गुणगुणत होते... ' ये रे घना ये रे घना.. न्हाऊ घाल माझ्या मना...!!'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा