रविवार, १७ डिसेंबर, २०२३

रडणारे मूल

रविवारची भर दुपारी 12/12.30 ची वेळ. सूर्य डोक्यावर आलेला. हिवाळा असल्याने ऊन सुसह्य होते. FC रोड वर वाहने व माणसे यांची गर्दी होती. तरुण तरुणी दुकानांच्या बाहेर घुटमळत होते.
वैशाली, रुपाली, वाडेश्वर एवढेच नव्हे पोटपुजेचे सगळे outlets ओसंडून वहात होते. गप्पा रेंगाळल्या होत्या. रविवार चा निवांत पणा वातावरणात उबदार आणि हवाहवासा वाटत होता. एकंदर खाणे-पिणे-खरेदी- विक्री यांची रेलचेल होती..पैसे खुळखुळत होते..QR code झटपट स्कॅन होत होते.

मनवा तिचा गाण्याचा तास संपवून बाहेर पडली. गाण्याचा क्लास FC रोड वर असला तरी थोडा आतल्या बाजूस एका छोट्या गल्लीत होता. दर रविवारी सकाळी 10 च्या आसपास ती इथे यायची. दुचाकी रोडवर पार्क करून आत चालत जायची. दर रविवार चा हा शिरस्ता तिने आज ही पाळला होता. 
FC रोड वरची दुपारची वर्दळ तिला सवयीची होती. एक वासुदेव महाराज आपली प्रभात फेरी संपवून पोटपूजा करण्यासाठी restaurant शोधत होते. खिशातल्या पैशांची मनातल्या मनात चाचपणी करत होते. त्यांचा तो आगळा वेष रस्त्यावरच्या कुत्र्यांना न झेपल्याने त्यांनी आक्रमणाचा पावित्रा घेतला होता आणि ती भुंकायला सुरू झाली होती. त्यांना मागे टाकून मनवा पुढे चालत गेली. Good luck चौकात सिग्नल लागला की रुपाली chya चौकात रस्ता ओलांडून आगरकर रोड वर यायला सोपे जाते. ही वेळ साधण्याची कला मनवां ने सरावाने आत्मसात केली होती. गाडीकडे चालतानाच तिने पाहिले की गाड्यांची वर्दळ कमी झाली आहे आणि आता पटकन गाडी काढून रस्ता ओलांडावा हे बरं ! 
पण गाडीपाशी येऊन पहाते तो काय ! एक मूल गाडीच्या मागच्या बाजूला रडत बसले होते. आठ नऊ वर्षांचे तरी असेल. बाजूला दोन फळकुट पडले होते. तो मुलगा असा रडत बसलेला पाहून मनवा ला वाईट वाटले. काय रे का रडतो आहेस? तिने त्याला जवळ जाऊन विचारले. काळे बेंद्रे, काळवटल्येल्या कपड्यामधले ते पोर..अंग मातकटलेले..केसाला किती दिवसात तेल पाणी मिळाले नव्हते कुणास ठाऊक..केसाला काय त्याच्या अंगाला ही किती दिवसात पाणी लागले नसेल त्याला ही आठवत नसेल.. मनवाने त्याच्या खांद्यावर ठेवण्यासाठी नेलेला हात नकळत मागे घेतला..शक्य तितक्या प्रेमाने ती त्याला रडायचं थांबण्यासाठी विनंती करत होती. तो हलल्याशिवाय गाडी निघणे अशक्य होते. तिने त्याच्या जवळ पडलेल्या फळ्या पायाने लांब ढकलल्या. पण हा पठ्ठा काही हलेना. त्याच रडू ही थांबेना.. मनवां ने गाडी काढली की लगेच आपली गाडी तिथे लावावी या हेतू ने एक जोडप येऊन थांबलेलं.. ते ही खोळंबल. मग तो बाईक वाला, त्याच्या गाडीवरून उतरला. त्याने गाडी साईड स्टँड ला लावली आणि आता तो ही ह्या रडक्या मुलापाशी येऊन त्याला सरकण्यासाठी अर्जव करू लागला. अशा रस्त्यावरच्या मुलाला जवळ घेणार तरी कोण..आणि त्याला शांत तरी कोण करणार ! स्वच्छतेचे बुरखे ओढून घेतल्यावर माणुसकी ही स्वच्छतेचे नियम पाळून वागू लागते..
आता रस्त्यावर एक छोटा प्रेक्षणीय प्रसंगच उभा राहिला होता. येणारे जाणारे लोकही वळून पाहू लागले. 
शेवटी बाईक वरून उतरलेल्या तरुणाने नाईलाजाने त्याचे खांदे धरले आणि एका बाजूला बसवले.
ह्याच रडणं तरी ही सुरूच ! त्या तरुणाने मनवाची गाडी एका बाजूने काढली..तिच्या ताब्यात दिली...स्वतःची गाडी लावली आणि आपल्या सखी सोबत तो निघून गेला..
मुलाचं रडणं सुरूच.. इतक्यात मागून एक आवाज आला..' ए....काऽऽय चाललय रे तुझं..'?? मुलाला तो आवाज ओळखीचा होता बहुतेक..त्याने चमकून वर पाहिलं..डोळ्यातलं पाणी आणि तोंडातून विव्हळण सुरूच.. समोर टपरीवर गळ्यात सोनेरी साखळ्या..( की साखळदंड..) घातलेला..दोन्ही हाताच्या बोटांमध्ये जाडजुड अंगठ्या घातलेला..केसांचा चित्रविचित्र कोंबडा केलेला कोणी दादा महाराज अवतरला होता !
आता मात्र ते रडणार मुल सावध झालं. क्षणात त्याचा सुर बदलला.. आवाज कमी करून ते हाताचे कोपर चोळू लागले... मनवा सारे न्याहाळत होती. तिचा पाय तिथून निघेना आणि काय करावे हे ही सुचेना. 
त्या मुलाने एक दोन मिनिटे कोपर चोळले. तिला दिसले की त्याला तिथे खरचटले होते..बहुतेक त्या फळ्या त्याच्या होत्या आणि त्या फळ्यामुळे त्याला लागले असावे. शर्टाच्या बाहिने त्याने नाक आणि डोळे पुसले. मागे उभ्या असलेल्या दादा महाराजांकडे पाहिले आणि शेवटी एकदाचा तो जागेवरून उठला. तिने पुढे सरकवून ठेवलेल्या फळ्या त्याने उचलल्या आणि उभ्या केल्या.. त्याच्या दुप्पट उंचीच्या फळ्या खांद्यापाशी तिरक्या धरून तो डेक्कन कडे चालत गेला ! मागे थांबून मनवा त्याच्याकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिली..की तिच्या डोळ्यातल्या पाण्यामुळे तो तिला दिसत नव्हता..?!