सोमवार, १३ नोव्हेंबर, २००६

आठवण तुझी येता...

प्रिया, तू गेलास त्याला किती काळ लोटला,
ह्याचा मी कधीच हिशोब केला नाही...
पण, आठवण तुझी येता वाटतं,
मागच्याच तर क्षणी तर,
तू माझ्यासमोर बसला होतास,
माझ्या नजरेत, स्वत:ला शोधत..!!
आणि मग,
नि:शब्द शांततेत
मला तुझे श्वास ऐकू येतात,
आणि मग तू मला दिसू लागतोस,
माझ्या कणाकणात!!!

सोमवार, ६ नोव्हेंबर, २००६

निरोप तुला देतो प्रिये...

मला ठाऊक आहे,
तू माझी नव्हतीस,
निरोप न घेता गेलीस,
इतकीही परकी नव्हतीस !


न कळले माझे प्रेम तुला,
मज दु:ख त्याचे नाही ...
न समजलेस मज तू मित्रही,
इतकेच मनाला सलते !!


ग़ेलीस तू सोडुनी प्रिये,
आठवणींचे क्षण काटेरी..
बोचतील ते पुन्हा मनाला,
पुन्हा पुन्हा मी होइन जखमी !!


न येशील तू परतुनी..
मज ठाऊक हे ग आहे..
न बघेन मी ही वाट तुझी,
मज शपथ तुझी आहे!!

प्रिय मैत्रेयीस..

होतीस साथ तू तेव्हा
तू आजही सोबत आहेस,
तुझे परकेपणही, आपले भासे तेव्हा,
आज ओळखही अनोळखी भासे!!


तू होतीस बुध्दीवादी,
पण जपायचीस मनाला,
हल्ली प्रेमही करतेस,
संभाळून व्यवहाराला !!


जमु लागलयं तुला,
मैत्रीचे जमाखर्च मांडायला..
स्वत:चे मत मांडताना,
मार्केटींग स्ट्रॅटेजी वापरायला !!


मैत्रेयी, तू हरवलीस,
मन सैरभैर आहे,
आठवणींच्या वाटेवर,
मन पुन्हा तुला शोधत आहे...


जीवनाच्या एका वळणावर,
आपले मार्ग का वेगळे झाले?
मी उत्तर शोधत आहे,
पुढच्या वळणावर भेटू कदचित,
असे उगीचच वाटत आहे !!

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २००६

मज तू सांगशील का?

कालची रात्रही प्रिया,
स्वप्नांमध्येच विरली,
रात्र सरली तरी,
स्वप्ने नाही संपली..

स्वप्नं माझे जाणता,
तो चंद्रही हळवा झाला,
बेभान होउनी तोही,
चांदणीला बिलगला...

स्वप्नात जे पाहिले,
ते सत्य का भासते,
तो हळुवार स्पर्श तुझा,
मी अजुन अनुभवते.

उमगले चंद्रास जे,
ते तुला समजेल का?
स्वप्न होइल का खरे,
मज तू सांगशील का?

मंगळवार, १० ऑक्टोबर, २००६

नाते न जुळले जरी...

( लोकसत्ताच्या चतुरा मासिकात प्रसिध्द झालेली माझी पहिली कविता...)
नाते न जुळले जरी,
प्रिया तुझे नि माझे,
आठवण तुझी येता,
मन का उदास होते?

आठवण तुझी येता,
मी सारं काही विसरते...
स्वप्नील तुझ्या डोळ्यातील,
स्वप्नं होऊन जगते...

आठवण तुझी येता,
मी रात्र रात्र जागते,
तुझ्या आठवणी कुरुवाळत,
उगीच कुस बदलत रहाते...

तु न झालास माझा,
हे स्विकारले जरी आहे...
आठवण तुझी येता,
मी तुझ्यात गुंतत जाते...

न उमगले कधीही,
हे असे का घडते...
पण, आठवण तुझी येता,
मी न माझी उरते !!