गुरुवार, १९ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - ४


वाट बघून बघून कंटाळल्यावर एकदाचा ’निकाल’ लागायचा...आईच्या भाषेत, ’आम्ही दिवे लावायचो !’ पुढच्या वर्गाची वाट दिसण्याएवढा उजेड आमचे दिवे पाडायचे.. कधी चुकून-माकून पेपर सोपे असल्यास पहिल्या दहात आमची वर्णी लागायची..पास झाल्याचा आनंद पेढे आणून साजरा करायचा...आणि पुण्याला जायची तयारी करायची...
एस.टी. बस ने जायचे तर मुंबई सेंट्र्लला जायचे, आणि रेल्वेने जायचे तर व्हि.टी. ला जावे लागायचे. तीन वर्षात, आम्ही एकदाच रेल्वेने आलो असू...बाबा रिर्झवेशन करुन ठेवायचे त्यामुळे जागा मिळण्याचा प्रॉब्लेम नसायचा..पण खिडकीची सीट कोणाची.. ह्यावरुन भांडणं व्हायची..त्यातही, ताई थोडी मोठी असल्याने तिची फार कटकट नसायची.. पण मी आणि सोनाली, म्हणजे माझी लहान बहीण, दोघींनाही खिडकी हवी असे..मग आईचा उपाय ठरलेला... खिडकी शेअर करायची.. एक तास मी, एक तास ती...आलटून पालटून त्या सीटवर बसायचो. ९२-९३ साली मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे नव्हता..त्यामुळे पुण्याला पोहोचायला कमीत कमी पाच तास तरी लागायचे. पनवेल, खोपोली, खंडाळा, लोणावळा.. वेगवेगळ्या स्टेशनवर थांबत गाडी पुढे जाई.
प्रवासाला निघायच्या आदल्या दिवशी आई चिवडा, भडंग असा काहीतरी चटपटीत खाऊ करुन ठेवायची.. आणि पुन्हा पहाटे उठून तिखट-मिठाच्या पुऱया किंवा मग बटाट्याची भाजी आणि पोळी असं काहीतरी करायची. प्रवासात, आई हे खाणं बरोबर घ्यायची..असा आवडता खाऊ असतानाही, स्टेशनवर फिरणाऱ्या फेरीवाल्यांची भूरळ न पडणं अशक्यच...आई अर्थातच काहीही घेत नसे..फार -फार तर लेमनच्या किंवा श्रीखंडाच्या गोळ्या !! अगदीच हट्ट केला तर मात्र पाठीत एक धपाटा मिळायचा ! पण आईने घ्ररून घेतलेला खाऊ भरपूर असल्याने, आईचा फारसा राग येत नसे..
आम्हाला बसवून दिले, की बाबा मामाला ऑफीसमध्ये फोन करुन आम्ही कितीच्या बसने येतोय आणि त्या बसचा नंबर कळवायचे. मग स्टॅंडवर मामा घ्यायला यायचा. एक वर्ष मात्र गडबड झाली. आम्ही ज्या एस.टी. ने येत होतो, ती एस.टी. घाटातच बंद पडली..घाटात फोन वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुसरी एस.टी. बस येईपर्यंत थांबण्याला पर्याय नव्हता.एक तासाभराने दुसरी बस आली. आमची पहिली बस, पुणे स्टेशनला जाणार होती. आणि ही आत्ता आलेली बस स्वारगेटला जाणार होती. हा मोठाच प्रॉब्लेम झाला. मामा स्टेशनला थांबणार आणि आम्ही स्वारगेटला उतरणार.. ते ही एक-दीड तास उशीरा...त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, त्यामुळे मामाला कळवणे अशक्य होते. शेवटी आम्ही स्वारगेटहून थेट घरी गेलो. पोहोचेपर्यंत आठ वगैरे वाजले.बिचारा मामा ! आमची गाडी वेळेवर न पोहोचल्याने जाम टेन्स झाला. एक तास भर वाट बघून त्याने डेपोत चौकशी केली. तिथे त्याला ही भानगड समजली. आत्तापर्यंत आम्ही घरी गेलो असू या विचाराने मग तोही घरी आला. प्रवासाच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत..
................................................................
मला तीन मावश्या. त्यातल्या दोघी पुण्यात.. एकतर मामाच्या अगदीच जवळ रहायची. आणि दुसरी शुक्रवार पेठेत...तिसरी मावशी, दहीवडीला रहाते. (दहीवडी, साताऱ्यात आहे.) आमचा मुक्काम सगळ्यात आधी मामाकडे ! आम्ही आल्यावर किंवा आमच्या आधीच दहीवडीची मावशी आलेली असायची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: