शुक्रवार, ६ एप्रिल, २००७

उन्हाळी सुट्ट्या - १

एप्रिलचा महिना उजाडलाय.. छळवादी वार्षिक परीक्षा संपत आलेल्या आहेत किवां संपल्या आहेत.. आणि सगळीकडे उन्हाळी सुट्ट्यांचे वेध सुरु झालेले आहेत. माझी साडेपाच वर्षांची चिमुरडी भाचीही काल जाम खुश होती...काल तिच्या शाळेचा शेवटचा दिवस होता.. आणि आता दोन महिनॆ शाळा नाही हे कळल्यामुळे स्वारी एकदम आनंदात होती..मला क्षणभर तिचा फार हेवा वाटला !! नोकरी सुरु झाल्यापासून, उन्हाळी सुट्ट्यांचे सुख अनुभवता येत नाही, पण तरीही, शालेय जीवनातील आठवणी अजुनही मनात घर करुन आहेत.
परीक्षा सुरु असतानाच आई वाळवणाची कामे सुरु करायची..पापडासाठी उडीद दळून आणले जात.वेफर्स साठी आई मोठे मोठे बटाटे आणायची. महिन्याच्या सामानाच्या यादीत, साबुदाणा, गहु नेहमीपेक्षा जास्त लिहिला जायचे...
ही सगळी तयारी होईपर्यंत, परीक्षा संपायची.. आणि मग सुरु व्हायचे एक एक वाळवणाचे पदार्थ ! पलंग, घरातून अगंणात यायचा...आम्ही तळमजल्यावरच रहायचो, त्यामुळे पलंग रोज आतबाहेर करताना फार त्रास नाही व्हायचा. पण वरच्या मजल्यवरच्या काकू लोकांचे फार हाल व्हायचे. मग एखाद्या दिवशी आमचे काम नसेल तर आमचा पलंग त्यांना दिला जायचा.
सगळ्यात आधी सांडगे घालून श्रीगणेशा केला जायचा आणि त्यानंतर मग साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापडया, बटाट्याचे वेफर्स,कीस, साबुदाणा आणि बटाटयाच्या चकल्या अशी उपवासाची बेगमी व्हायची. वेफर्स वाळत घालताना, आम्हा बहिणींची स्पर्धा स्रुरु व्हायची, कोण किती वेफर्स वाळत घालू शकते? यावर वाद व्हायचे...आईला हे हवच असायचं, कारण त्यामुळे, काम भरभर उरकली जात. ज्या दिवशी पदार्थ केला जायचा, त्या संध्याकाळी तो पदार्थ आई तळायची, आणि त्याची अर्धवट वाळलेली चव काही वेगळीच लागायची.
हे सारे सुरु असताना आई मधेच एक दिवस कुरडया करण्यासाठी गहू भिजवायची. मग आम्ही दिवस मोजायचो.. चिक कधी खायला मिळेल याची वाट बघणं सुरु व्हायचं. दोन दिवसातच घर ओल्या गव्हाच्या आंबूस वासाने, भरुन जाई. खंरतर कुरडया करणं हे फार कष्टाचे काम ! चिक हाटणं, तो गरम असतानाच त्याच्या कुरडया करणं, हे सारं मला फार अवघड वाटतं. चिक हाटण्यासाठी दोन माणसे लागायची, त्यामुळे आईला शेजारच्या काकू मदत करायच्या.. आमची मदत फक्त खाण्यासाठीच.. फारफार तर, सोयामध्ये चिक भरुन देण्याचे काम आम्ही करायचो..गव्हाचे थोडेसे दूध आई ठेऊन द्यायची. कुरडया करुन झाल्यावर शेवटी, आम्हा सगळ्यांना खाण्यासाठी त्या दुधाचा आई चिक करायची.. गरम चिक, तूप आणि साखर घालून इतका स्वादिष्ट लागायचा !!
कुरडया झाल्यावर, पापडांची तयारी सुरु व्हायची. पापड करताना सगळ्यात जास्त मजा यायची. पापड करणे हे खरतर खूप वेळखाऊ काम! पण पापड करायला आसपासच्या आईच्या मैत्रिणी, आमच्या मैत्रिणी एकत्र जमायचो. ज्याचे पापड करायचे, त्याच्या घ्ररी धुमाकूळ ! सकाळी अकरा ते एक आणि मग दोन ते पाच - साडेपाच, पापड करताना गप्पांचा नुसता खच पडायचा. पापड करता करता एखादी लाटी, तेल लावून तोंडात टाकली जायचीच! ज्यांचे पापड करायचे, त्यांच्याकडे दुपारचे जेवण आणि चारचा चहा!! सगळ्यांचे पापड होईपर्यंत हे सुरु रहायचं.
ही सगळी कामं करायची, ते रविवार सोडून ! रविवारी, बाबांना सुट्टी !! तो दिवस फिरण्यासाठी राखीव असायचा...
(क्रमश:)

1 टिप्पणी:

कोहम म्हणाले...

chaan...mazya klahanapani valvanacha evadha navata....pan mala athavata te itaranchya valvanatun dhapaleli chincha...kimva divalichya suttit fatake valavna....